Friday, March 6, 2015

भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे – भाग १

भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे – भाग १
भगवान बुद्धांच्या दु:खमुक्तीच्या मार्गाचा विचार करण्यापूर्वी पहिल्यांदा त्यांच्या शिकवणीचे तीन लक्षणे समजून घेणे आवश्यक आहे. कारण ते दु:ख निर्मिती व दु:खमुक्तीच्या बाबीशी निगडीत आहेत. त्यांच्या धम्माचे अनित्य, अनात्म, आणि दुख असे तीन लक्षणे आहेत,
अनित्यता
अनित्यता हे पहिले लक्षण आहे. भगवान बुध्द म्हणतात, "सर्व वस्तु अनित्य आहेत. जे अनित्य आहे ते दु;ख आहे. जे दु:ख आहे, ते 'मी नाही' 'माझे नाही' 'माझा आत्मा नाही."
जे नित्य नाही, ते अनित्य आहे. जगातील सर्वच संस्कारित गोष्टी अनित्य आहेत. कारणांनी उत्पन्न होणार्याे सर्व गोष्टी अनित्य आहेत. डोळ्यांना जे दिसते ते अनित्य आहे. कानांना जे ऎकु येते ते अनित्य आहे. जिभेने ज्याची चव घेतली जाते, ते अनित्य आहे. नाकाने ज्याचा वास घेतला जातो, ते अनित्य आहे. त्वचेने ज्याचे स्पर्श ज्ञान होते, ते अनित्य आहे. मनाने केलेली कल्पना व विचार अनित्य आहे. तसेच डोळे, कान, जिभ, नाक, त्वचा व मन यांच्या स्पर्शाने होणार्या वेदना की ज्या सुखकारक, दु:खकारक किंवा असुखकारक, अदु:खकारक असतात, त्या सुध्दा अनित्य आहेत.
एक निर्वाण सोडले तर जगातील सर्वच गोष्टी संस्कारित म्हणजे दोन किंवा अधिक घटकांनी मिळून झालेल्या आहेत. म्हणून निर्वाण सोडून जगातील सर्वच गोष्टी अनित्य आहेत.
रुप (शरीर), वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पंचस्कंध अनित्य आहेत. त्याचा उदय होतो आणि लय होतो. जे अनित्य आहे, ते दु:ख आहे. जे दु:ख आहे, ते अनात्म आहे. जे अनात्म आहे, 'ते ना मी आहे, ना माझे आहे, ना माझा आत्मा आहे.' याला यथार्थत: प्रज्ञापुर्वक पाहिले पाहिजे. अशी शिकवण त्रिपिटकात विशेषत: संयुक्त निकायात जागोजागी वाचावयास मिळते.
कोणाच्या अपमानास्पद बोलण्याने आपला अहंभाव दुखावला गेला की दु:खदायक वेदना होतात. वास्तविक ते नुसते शब्द असतात. जी वेदना निर्माण होते, ते आपल्या 'मी'पणाच्या भावनेवर ठरते. जर आपल्यात लोभ, द्वेष व मोह नसेल तर ते बोलणार्या चे शब्द आपण उपेक्षा वृत्तीने ऎकतो. त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत जी वेदना निर्माण होते, ती ना सुखकारक असते ना दु:खकारक. त्या बोलण्यामुळे आपण कंपीत न होता निश्चल राहतो. आपले चित्त विचलीत होत नाही.
एकदा भगवान बुध्दांकडे एक मनुष्य आला आणि तो बराच वेळ भगवान बुध्दांना शिव्याशाप देऊ लागला. परंतु भगवान बुध्द विचलीत झाले नाहीत. तेव्हा त्याने भगवान बुध्दांना विचारले, 'तुम्ही शांत कसे?'
भगवान बुध्द म्हणाले, 'जर एखाद्या माणसाने एखादी वस्तु तुला भेटवस्तू देण्यासाठी आणले व ती तू स्विकारlली नाही तर ती कोणाजवळ राहील?'
तो मनुष्य म्हणाला, 'अर्थातच, ज्या माणसाने आणली त्याचेकडेच राहील.'
भगवान बुध्द म्हणाले, 'तु दिलेल्या शिव्याशापाची भेटवस्तू मी स्विकारली नाही तर ती कोणाकडे राहील.'
तेव्हा तो मनुष्य खजील झाला व भगवान बुध्दांना शरण गेला.
म्हणून भगवान बुध्द म्हणतात की, जे अनित्य आहे ते दु;ख आहे. जे दु:ख आहे त्याला हे 'मी नाही, हे माझे नाही, हा माझा आत्मा नाही.' असे यथार्थत: प्रज्ञापुर्वक पाहिले की चित्ताची आसक्ती निर्माण होणार नाही. त्यामुळे 'मी, माझ्या' या भावनेला कवटाळून न धरल्यामुळे 'अहंभाव' निर्माण होणार नाही आणि त्यामुळे माणसाना दु:ख होणार नाही
भगवान बुध्दांचे शेवटचे शब्द-
हन्द दानि भिक्कवेआमन्त्यामि।
व्यय धम्मा संक्खाआरा अप्पमादेन सम्पादेथ॥
याचा अर्थ खरोखर भिक्खूंनो, 'मी तुम्हाला सांगतो, सर्व संस्कारित गोष्टी नष्ट होणार्यान आहेत. तेव्हा अप्रमादपूर्वक आपल्या जीवनाचे ध्येय संपादन करा.'
भगवान बुध्दांचे हे वाक्य सर्व बुध्द धम्माचे सार आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व मानव जातीला यशस्वी जीवन जगण्याचा संदेश आहे. सगळ्याच संस्कारित गोष्टी अनित्य आहेत. बदल होणार्या् आहेत. परिवर्तनशील आहेत. तेव्हा त्यात गुंतून न राहता आपले ध्येय संपादीत करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बुध्द आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात लिहीले आहे की, भिक्खू रठ्ठ्पाल यांना सम्यक सम्बुध्दांनी चार तत्वे सांगितले. ते असे-
१ जग अनित्य असून सतत बदलत आहे.
२. जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.
३. आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.
४. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दु:ख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'बुध्द आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात म्हणतात की, अनित्यतेच्या सिध्दांताला तीन पैलू आहेत-
१) अनेक घटकांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत.
२) व्यतिगत रुपाने प्राणी अनित्य आहेत. आणि
३) प्रतित्वसमुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहेत.
सर्व वस्तू 'हेतू आणि प्रत्यय' यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसते. जो प्राणी भूतकाळात होता. तो तसाच वर्तमानकाळात दिसणार नाही. शरीरातील प्रत्येक अणु-रेणू बदलत असतात. शरीर, मन बदललेले असते. विचार आणि विचार करणारी यंत्रणा बदललेली असते. पूर्वी लहान होतो. नंतर तरुण, वयस्क व शेवटी म्हातारे झालोत. म्हणजेच मनुष्य आणि इतर सर्वच प्राणी, वनस्पती हे परिवर्तनशील आहेत. जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते. जग जर परिवर्तनशील नसते तर सर्व पाणीमात्राचा विकास झाला नसता. म्हणून भगवान बुध्दांनी सांगितले की, जग हे अनित्य आहे. ते सतत बदलत असते.
आर.के.जुमळे, अकोला ९३२६४५०५०६

No comments:

Post a Comment