भविष्यात क्रांतीची ताकद 'बामसेफ'मध्येच | |
- - गुरुवार, 1 मार्च 2012 - 02:15 AM IST पुणे - 'खासगीकरण, जागतिकीकरणामुळे आज देश संक्रमणावस्थेतून जात असून, येत्या दहा वर्षांत क्रांतिकारक परिस्थिती निर्माण होईल. या परिस्थितीला क्रांतीचे स्वरूप प्राप्त करून देण्याची ताकद "बामसेफ' निर्माण करेल,'' असा विश्वास "बामसेफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज व्यक्त केला. "बामसेफ'चे संस्थापक डी. के. खापर्डे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणा दिवस कार्यक्रमात मेश्राम बोलत होते. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, इंदुमती खापर्डे, "बामसेफ'चे प्रदेशाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, डी. डी. अंबादे, डी. आर. ओव्हाळ, हनुमंत बारवकर, प्रमोद खापर्डे आदी उपस्थित होते. मेश्राम म्हणाले, 'अत्यंत कठीण परिस्थितीत खापर्डे यांनी संघटनेला जे नेतृत्व दिले, त्यामुळेच "बामसेफ' जिवंत राहिली. त्यांनी केलेल्या त्यागातूनच आज हे संघटन 13 राज्यांमध्ये 140 जिल्ह्यांत पसरले आहे. फुले-आंबेडकर चळवळीची जी पोकळी निर्माण झाली होती, ती "बामसेफ'ने आज भरून काढली आहे.'' दाहक वास्तवाच्या विरोधात बुद्धिजीवी संघटन निर्माण करण्याचे काम "बामसेफ'च्या माध्यमातून सुरू असून, समाजक्रांतीच्या वाटेवर एक महत्त्वाचे पाऊल त्यांनी टाकले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. कांशीराम यांचा वारसा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचा वारसा इतर कोणी नाही तर "बामसेफ'च चालवीत आहे, असे मेश्राम यांनी या वेळी सांगितले. कांशीराम हे खापर्डे यांना आपले गुरू मानत होते. या दोघांचे योगदान मोठे असून, त्यांच्या विचारांच्या रस्त्यानेच आम्ही पुढे चालत आहोत. महाराष्ट्रातील इतर चळवळींनी फसवणुकीशिवाय काही दिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. |
Wednesday, September 18, 2013
भविष्यात क्रांतीची ताकद 'बामसेफ'मध्येच
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment